आ. सत्तार यांचा पुढाकार; ११ कोटी ३७ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी
सिल्लोड, (प्रतिनिधी) : अंभई जिल्हा परिषद गटातील अंभई नानेगाव जंजाळा (ता. सिल्लोड) या सुमारे ११ कि.मी. लांबीच्या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्यासाठी राज्य शासनाकडून तब्बल ११ कोटी ३७ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीतून रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण तसेच काँक्रीटीकरण करण्यात येणार असून परिसरातील नागरिकांना सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या रस्त्यामुळे अंभई, नानेगाव आणि जंजाळा या गावांमधील दळणवळण अधिक सुलभ होऊन शेतकरी, विद्यार्थी व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी बोलताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, मतदारसंघातील ग्रामीण मुख्यमंत्री ग्राम सडक योजना भागातील रस्ते विकासाला प्राधान्य देण्यात येत असून या कामामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. स्थानिक नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभहोण्यासोबतच आर्थिक घडामोडींनाही गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य अॅड. अब्दुल आमेर होते. कार्यक्रमास जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, नगराध्यक्ष
अब्दुल समीर, जि. प. सदस्य देविदास पा. पालोदकर, विनोद मंडलेचा, कृ. उ. बा. समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे, सरपंच रामदास दुतोंडे, उपसरपंच रईस देशमुख, मोहसीन देशमुख, अब्दुल करीम चेअरमन, अय्युब खान, कालुखान इस्माईल, फकिरा रज्जाक, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंता उमेश लिंभारे, मंगेश दापके आदींसह स्थानिक पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











